कर्वे संस्थेत ‘आकार’ या नवीन शाखेचे उद्घाटन
दि. १४ जून २०२५ - महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या १२९ व्या वर्धापन दिनानिमित्त आज संस्थेमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते. प्रतिवर्षीप्रमाणे सकाळी आठ वाजता महर्षी कर्वे यांच्या समाधीस्थळी अर्थात वृंदावन बागेमध्ये सामूहिक प्रार्थना संपन्न झाली. या दिवसाचे औचित्य साधून आज संस्थेने एका नव्या शाखेची सुरुवात केली. ‘आकार’ या नावाने सुरू झालेल्या या शाखेचे मुख्य उद्दिष्ट ‘भारतीय ज्ञानपरंपरेचे पुनरुत्थान’ हे असून अहमदाबाद येथील पुनरुत्थान विद्यापीठाच्या प्रेरणेमधून या शाखेची सुरुवात झाली आहे.

मागील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये संस्थेचा बाया कर्वे पुरस्कार पुनरुत्थान विद्यापीठाच्या कुलपती श्रीमती इंदुमती काटदरे यांना प्रदान करण्यात आला होता. या निमित्ताने संस्थेचा पुनरुत्थान विद्यापीठाच्या कार्याशी संबंध आला. भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित अभ्यासक्रम, साहित्य, शिक्षकांचे प्रशिक्षण या क्षेत्रामध्ये पुनरुत्थान विद्यापीठ २००४ सालापासून कार्यरत आहे. आजच्या भौतिकताप्रधान काळामध्ये भारतीय ज्ञान परंपरेच्या पुनरुत्थानाची गरज आणि महर्षी कर्वे यांचाही स्त्री शिक्षणामागील भारतीयतेचा आग्रह या गोष्टी लक्षात घेऊन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने या प्रकारचे काम आपल्या संस्थेमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज आकार या नूतन शाखेचे उद्घाटन एका सुंदर सोहळ्यामध्ये झाले.
औषधि उत्पादन क्षेत्रात व्यावसायिक कारकीर्द करून सध्या पालघर येथे गोशाळा चालविणारे पुनरुत्थान विद्यापीठाचे अध्येता श्री विनोद सिंह हे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच अमेरिकास्थित राष्ट्रसेविका समितीच्या कुटुंब प्रबोधन राष्ट्रीय सहप्रमुख श्रीमती अंजली पटेल या विशेष अतिथी म्हणून या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होत्या. संस्थेच्या वतीने कार्याध्यक्ष श्री. रवींद्र देव, व्यवस्थापक मंडळ सदस्य श्री. जयंत इनामदार, श्रीमती सीमा कांबळे, सीए अभय कुलकर्णी, सचिव डॉ. पी.व्ही. एस. शास्त्री, उपसचिव श्रीमती कांचन सातपुते हे मान्यवर उपस्थित होते.
भारतीय परंपरेप्रमाणे शंखध्वनी करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. सुरुवातीला ‘आकार’ बाबत माहिती देणारी एक चित्रफित सर्वांना दाखवली गेली. कार्यक्रमाचे प्रास्तविक ‘आकार’ चे अध्यक्ष आणि व्यवस्थापक मंडळ सदस्य सीए अभय कुलकर्णी यांनी केले. ‘जनरल डायर ने मोठा नरसंहार केला, हे आपल्या लक्षात राहते ; परंतु लॉर्ड मेकॉलेने इथे पाश्चात्य शिक्षणपद्धती रुजवून अनेक पिढ्यांचे मेंदू मृतप्राय करून टाकले, ही बाब मात्र आपण विसरून जातो, असे सांगून त्यांनी भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि आकार ही शाखा सुरू करण्याचे प्रयोजन सर्वांपुढे मांडले. यानंतर श्री महेंद्र वाघ यांनी दोन्ही अतिथींचा सविस्तर परिचय करून दिला आणि संस्थेच्या वतीने या अतिथींचे भारतीय परंपरेप्रमाणे वस्त्र, पत्र, पात्र, पुष्प, फल, दक्षिणा आणि ग्रंथभेट देऊन औपचारिक स्वागत केले गेले. ‘आकार’ संकल्प पत्राचे अनावरण करून या शाखेचे उद्घाटन मान्यवरांनी केले. या संकल्प पत्राचे वाचनही यावेळी करण्यात आले
‘बदलत्या काळामध्ये कुटुंब व्यवस्था देखील बदलली असली तरीसुद्धा जीवनमूल्यांचे महत्त्व आपण विसरता कामा नये’ असे उद्बोधन श्रीमती अंजली पटेल यांनी आपल्या मनोगताद्वारे केले. ‘जीवनमूल्यांची किंमत एकदा समजली की ती आपल्याकडून हरवणार नाहीत. आज कुटुंबातील संवाद हरवल्यामुळे घरातील लहान मुले सुद्धा नैराश्याच्या गर्तेमध्ये सापडतात, अशी समाजाची परिस्थिती झालेली आहे. असे न होण्यासाठी संवाद वाढवणे आणि बदलत्या समाजरचनेमध्ये मैत्रीची वर्तुळे वाढवणे आणि टिकवणे हेच काम आपल्याला करावे लागणार आहे’, असे त्या यावेळी म्हणाल्या.
श्री विनोद सिंह यांनी आपल्या प्रमुख उद्बोधनामध्ये ‘आकार’ शाखेच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतल्याबद्दल महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘मेकॉले शिक्षणपद्धतीने आपल्याला नोकर केले आहे. आजही या व्यवस्थेमध्ये विविध मार्गांनी आपल्याला एकेकटं पाडलं जात आहे. कुटुंब किंवा समूह अशी ओळख न राहता व्यक्ती म्हणून ओळख अधिक ठळक होत चालली आहे. नाती संपत चालली आहेत. या पृष्ठभूमीवर मूळ भारतीय विचार समजून घेऊन त्याप्रमाणे समाज घडविणे, हे आवश्यक आहे. त्याकरिता संपूर्ण जीवनाला उन्नत करणारी भारतीय शिक्षणपद्धती अवलंबणे हाच मार्ग आहे. पुनरुत्थान विद्यापीठाने हेच काम हाथी घेतले आहे. कर्वे संस्थेसारख्या मोठ्या संस्थेने हा विचार घेऊन एका नव्या शाखेची सुरुवात करणे, ही फार मोठी आशाजनक बाब आहे. स्त्री ही मुळातच शक्तिस्वरूप असल्याने तिने जर स्वत:ची ओळख भारतीय विचारांच्या प्रकाशात समजून घेतली तर हा देश खऱ्या अर्थाने शक्तिसंपन्न होईल.’ शेवटी, ‘आकार’ या शाखेसाठी पुनरुत्थान विद्यापीठाकडून आवश्यक ती सर्व मदत वेळोवेळी केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
संस्थेच्या उपसचिव श्रीमती कांचन सातपुते यांनी संस्थेच्या वतीने सर्व अतिथि आणि संबंधितांचे आभार मानले. संस्थेच्या ‘आरुणि विद्या मंदिर’च्या मुख्याध्यापिका आणि ‘आकार’ शाखेच्या प्रमुख श्रीमती अक्षदा कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्रीमती ऐश्वर्या परांजपे यांनी गायिलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.